पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सातही गावांतील शेतकऱ्यांकडून संमती देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मुदतवाढीनंतर मंगळवारपर्यंत तब्बल ९४% शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) जमिनीची मोजणी सुरू होणार असून, ती २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने २५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांचे समुपदेशन करून संमती घेण्यास सुरुवात केली. १८ सप्टेंबरपर्यंत ९०% शेतकऱ्यांनी संमती दिली होती. मात्र काही शेतकऱ्यांनी व सरपंचांनी मुदतवाढीची मागणी केल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
गेल्या महिनाभरापासून भूसंपादन उपविभागीय समन्वयक आणि अधिकारी सासवड येथे तळ ठोकून शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. या प्रयत्नांमुळे संमती प्रक्रियेला गती मिळाली आहे. आतापर्यंत २७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकरी तयार झाले आहेत. विमानतळासाठी एकूण सुमारे ३००० एकर जमिनीची गरज असून, त्यापैकी मोठा भाग निश्चित झाला आहे.
या सात गावांत सरकारच्या मालकीची जवळपास २०० एकर जमीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मिळालेल्या २,७०० एकरांसह एकूण २,९०० एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत ९४% शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. शुक्रवारपासून मोजणीची प्रक्रिया सुरू करू. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दर निश्चितीसाठी प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर संमती दिलेल्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला सुरुवात होईल.”


0 Comments